मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची कोंडी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगित केले. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊ केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी यावरुन सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी २ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांन मी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन हा संभ्रम दूर करणार आहे.मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न विशिष्ट कालमर्यादेत निकाली काढण्याचे आश्वासन पदरात पाडून त्यांनी मोठे यश मिळवल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडून आणखी एक दान पदरात पाडून घेतले आहे. ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत येत्या दोन महिन्यांमध्ये कोणतीही नोकरभरती करायची नाही. राज्य सरकारने ही अट मान्य केली आहे. या काळात सरकारने नोकरभरती केली तरी मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवल्या जातील, ही अट सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे हे एकप्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यासारखेच आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
Users Today : 37