एसटीपीच्या पाण्याला मिळेनात ग्राहक; पालिकेला महिन्याला लाखोंचा फटका

Khozmaster
2 Min Read

 छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने कांचनवाडी येथे उभारलेल्या एसटीपीच्या (मलजल प्रक्रिया प्रकल्प) ग्राहक मिळत नसल्यामुळे दर महिन्याला केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांनी बांधकामासाठी किंवा त्यांच्या परिसरातील बागकामासाठी वापरावे असे आवाहन करण्यात आले होते, पण त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाच्या शहरी पायाभूत विकास योजनेतून (यूआयडीएसएसएमटी) भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. यात एसटीपीचादेखील समावेश होता. त्यानुसार झाल्टा, बनेवाडी, कांचनवाडी या ठिकाणी एसटीपी उभारण्यात आले. कांचनवाडी येथे सर्वांत मोठा एसटीपी उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता रोज १६५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. प्रक्रिया करण्यासाठी सध्या एवढे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ६५ ते ७० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया करण्यात आलेले पाणी पिण्याच्या योग्यतेचे नसले तरी ते बांधकामासाठी, बागकामासाठी वापरले जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेने उद्योजकांना, बांधकाम व्यावसायिकांना आवाहन करून एसटीपीचे पाणी वापरण्याची विनंती केली, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेच्या उद्यानांसाठी, रस्ते धुण्यासाठी, दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्यासाठी महापालिका एसटीपीच्या पाण्याचा वापर करीत आहे, परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले सुमारे साठ एमएलडी पाणी एसटीपीच्या शेजारून वाहणाऱ्या नाल्यामध्ये सोडून द्यावे लागत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीपी चालवण्यासाठी दर महिन्याला सुमारे अकरा हजार ९०० युनिट वीज लागते. साडेदहा रुपये प्रतियुनिट या दराने विजेवर खर्च केला जात आहे. दर महिन्याला सव्वा लाख रुपयांच्या घरात वीज बिलावर खर्च होत असून त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार, मल जलावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी रसायने, एसटीपीच्या व्यवस्थापनावर केला जाणारा खर्च याचा विचार करता दर महिन्याला पाच ते सात लाखांच्या घरात खर्च केला जातो, परंतु प्रक्रिया केलेल्या पाण्याला ग्राहक उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेला उत्पन्न मात्र मिळत नाही, उत्पन्न न मिळाल्यामुळे पालिकेला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *