खून करून अपघाताचा बनाव, सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले

Khozmaster
2 Min Read

पुणे : अनेक महिन्यांपासून गोदामाचे थकलेले भाडे आणि उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्याने भाडेकरूने कामगारांच्या मदतीने मालकाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केला. खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी अपघाताचा बनाव रचला; पण लोणीकंद पोलिसांनी खुनाच्या संशयावरून तपास करून एकाला अटक केली. मुख्य आरोपी आणि त्याचे चार साथीदार फरारी आहेत.बाजीराव उर्फ आबा सुदाम खांदवे (वय ५७, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नागेश नाईक, लक्ष्मण नारायण इमनेल्लू, मोनू, साजन (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण इमनेल्लू याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरात खांदवे यांचे मोठे गोदाम असून, त्यांनी आरोपी नागेश नाईक याला ते भाड्याने दिले होते. फरसाणच्या गोदामात आरोपी मोनू, साजन आणि इतर दोन जण कामाला होते. गोदामाशेजारी लक्ष्मण इमनेल्लू याचे कटिंगचे दुकान आहे. अनेक महिन्यांपासून आरोपी नाईकने गोदामाचे भाडे खांदवे यांना वेळेवर दिले नव्हते. याशिवाय नाईक याने खांदवे यांच्याकडून उसने पैसेही घेतले होते.थकलेले भाडे आणि उसन्या पैशांवरून नाईक आणि खांदवे यांच्यात सतत वाद होत होते. आर्थिक वादाला कंटाळून नाईक याने कामगारांच्या मदतीने खांदवे यांचा खून करण्याचे नियोजन केले. खांदवे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. पोलिसांना खुनाचा संशय येऊ नये, म्हणून आरोपींनी खांदवे यांचा मृतदेह टेम्पोमध्ये घालून बावडी हद्दीत खाणीत टाकून दिला आणि पळ काढला.या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार दाखल होती. लोणीकंदहद्दीत मृतदेह सापडून आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी घटनास्थळाची केलेली पाहणी आणि गोदामातील कामगार फरारी झाल्याने खांदवे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस कर्मचारी स्वप्नील जाधव यांनी गोदामाशेजारील कटिंग दुकानचालक लक्ष्मण इमनेल्लू याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर खून झाल्याचे समोर आले.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *