वाहनाचा किरकोळ अपघात, तरुणाला कायद्याचा धाक दाखवत पोलिसाने पैसे उकळले, उपनिरीक्षक निलंबित

Khozmaster
2 Min Read

 मुंबई: वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून ७० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी गंभीर दखल घेऊन उपनिरीक्षक कुटे यांना निलंबित केले आहे.सानपाड्यात राहणारा मुर्तजा पत्रावाला (२४) हा तरुण ३० ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईतून आपल्या कारने सानपाडा येथे येत होता. मानखुर्द सिग्नलवर त्याची कार दुसऱ्या गाडीला घासली होती. हे घटनास्थळ मुंबईतील असताना, तसेच किरकोळ अपघात असतानाही व त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नसताना वाशी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक कुटे यांनी पत्रावाला याला पोलिस ठाण्यात बोलावले आणि कलम ३०७ व ‘हिट अँड रन’ची केस दाखल करून त्याला तीन वर्षांसाठी आत टाकण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर कुटे यांनी मुर्जता याला मारहाण केली, तसेच दुसऱ्या गाडीचालकाचे पाय धरून माफी मागण्यास सांगून पैसे देऊन तडजोड करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर कुटे यांनी मुर्तजाचे वडील अतीसागर पत्रावाला यांच्याकडे गाडीच्या मालकासाठी नुकसानभरपाई म्हणून ३० हजार घेतले. तसेच पाऊण तासानंतर पोलिस ठाण्यात पत्रावाला यांचे मित्र सिद्धार्थ यांच्याकडून पोलिस ठाण्यात ४० हजार रुपये स्वीकारले.

या प्रकारानंतर पत्रावाला यांनी पोलिस आयुक्तांकडे तसेच परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. उपायुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांना शनिवारी निलंबित केले.

दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका

पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे हे एक जबाबदार पोलिस अधिकारी असताना, त्यांनी बेकायदा कृत्य करून पत्रावाला यांच्याकडून पैसे स्वीकारल्याचा ठपका पोलिस उपाक्तांनी काढलेल्या आदेशात ठेवण्यात आला आहे. ही घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून लोकहिताच्या दृष्टीने पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन करणारी असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *