मुंबई: एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम राबवला जात आहे, असा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती देणारी याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी काही गंभीर आरोप केले.बाळासाहेब सराटे यांनी २०१८ साली ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती. सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या धनगर, वंजारी यासारख्या जातींचा ओबीसीतील समावेश बेकायदेशीर आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे पुनसर्वेक्षण करण्यात यावे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही २०१८ सालची केस आहे. ती आता पुन्हा उकरुन काढण्यात आली आहे. या माध्यमातून एका बाजूने मागच्या दाराने ज्यांना आरक्षण देऊ शकत नाही, अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्रं द्यायची आणि ओबीसीमध्ये आणायचे. दुसऱ्या बाजूने ओबीसीमध्ये आहेत त्यांना हायकोर्टात जाऊन ओबीसी प्रवर्गाच्या बाहेर ढकलायचे, असा दुहेरी कार्यक्रम सुरु आहे. आम्ही या सगळ्यावर लक्ष ठेवून आहोत, असे भुजबळ यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला नसला तरी अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. कोणत्याही नेत्याने ओबीसी किंवा मराठा समाजात संशयाची बीजे पेरण्याचे काम करु नये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी किंवा अन्य कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. छगन भुजबळ यांचं वक्तव्य १०० टक्के अयोग्य आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा झाली होती. तरीही छगन भुजबळ अशाप्रकारे बोलत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. छगन भुजबळ लोकांची दिशाभूल करुन संभ्रम पसरवत आहेत. छगन भुजबळ यांना ओबीसींचा तारणहार अशी प्रतिमा निर्माण करायची आहे. अशाप्रकारची सनसनाटी वक्तव्यं करणं ही त्यांची जुनी सवय आहे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली.
Users Today : 63