मुंबई : गजबजलेल्या बाजारपेठा, मिठायांच्या दुकानांमध्ये झालेली गर्दी, रांगोळ्यांचे रस्त्यांवर उतरलेले रंग आणि सरकारी, खासगी इमारतींपासून दुकाने, घरे यांमध्ये सजलेले आकाशकंदील यंदाच्या दिवाळीची कथा सांगत आहेत. गेल्या वर्षापेक्षाही यंदा दिवाळीचा उत्साह अधिक जाणवत असून, मुंबईकर पिशव्या भरभरून खरेदी करताना दिसत आहेत. प्रदूषण, निवडणुका, आजूबाजूला भेडसावणाऱ्या असंख्य समस्या यांचा विचार विसरून मुंबईकर दिवाळीची तयारी करत आहे.
गल्ल्यागल्ल्यांमध्ये लागलेली फटाक्यांची दुकाने, फराळांचे लहान स्टॉल लहान-लहान खरेदीसाठी मुंबईकरांना खुणावत आहेत. चिवडा, चकल्यांपासून अनारसे, चिरोटे यांसारखे पदार्थही उपलब्ध आहेत. घरामध्ये दोन प्रकारचे लाडू करून इतर पदार्थ बाहेरून मागवण्याकडे नोकरदार वर्गाचा कल वाढत असल्याने दिवाळीच्या निमित्ताने अनेक हातांना रोजगारही मिळाला आहे. लहानशा टोपल्यांमध्ये रंगवलेल्या पणत्या घेऊन फिरणारी लहान मुले, बॅटरीवर पेटणारे दिवे, इलेक्ट्रिक पणत्या यांनीही बाजार उजळून गेले आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेकांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे.बुधवारी ढगाळलेल्या आभाळामुळे मुंबईमध्ये उकाड्याची तीव्र जाणीव होत होती. मात्र या उकाड्याचा आणि संध्याकाळी पडलेल्या हलक्या सरींचा परिणाम मुंबईच्या खरेदीच्या उत्साहावर झाला नाही. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट येथे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. शॉपिंग मॉलमध्येही ब्रॅण्डेड कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईकर पोहोचले होते. दिवाळीच्या निमित्ताने यंदा बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या उलाढालीला जराशी विश्रांती मिळेल. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दिवाळीचा पाडवा, भाऊबीज या दोन्ही दिवशी खरेदीच्या उत्साहाला पुन्हा उधाण येईल.
Users Today : 36