छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या आरक्षण प्रक्रियेत कुणबी नोंदी तपासणी सुरू आहे. लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी आढळल्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकते का अशी चर्चा सुरू आहे. तर अशा पोटजातीसुद्धा मुख्य जातीच्या दाखल्यास पात्र आहेत, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. या मोहिमेत लिंगायत, मारवाडी यांच्यासह इतर मराठेतर जातींच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे कुणबी नोंद असलेल्या इतर जातींनाही ओबीसी आरक्षण मिळू शकेल का, अशी चर्चा सुरू आहे. महसूल प्रशासन गतीने नोंदी तपासत आहेत.
२६ सप्टेंबर २००८ च्या संपूर्ण ओबीसी यादीत अनेक पोटजाती आरक्षण घेत आहेत. मारवाडी न्हावी (न्हावी पोटजात), लिंगायत वाणी (वाणी पोटजात), लेवा पाटीदार (कुणबी पोटजात), लिंगायत माळी, लिंगायत न्हावी, लिंगायत कुंभार अशा सगळ्या जातींना आरक्षण मिळते. त्यामुळे मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, इत्यादी पोटजातीसुद्धा नोंद असल्यास आरक्षणास पात्र ठरतात. प्रचलित आरक्षण असेच दिले जाते.
डॉ. बाळासाहेब सराटे, आरक्षण विषयाचे अभ्यासक
Users Today : 66