हिंगोली : कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन गोळ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांना लागल्या असल्यामुळे त्यांच्यावर हिंगोली येथे खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर या प्रकरणी पाच आरोपींविरोधात हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक विकास पाटील घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी दोन काडतूस आढळून आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Users Today : 64