सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले असतानाच खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाला आता नवा आयाम मिळणार आहे. गुंडेवाडी या गावाचे नाव बदलले असून मनोज जरांगे पाटील हे या ऐतिहासिक नामकरण सोहळ्याचे साक्षीदार राहिले आहेत.
खटाव तालुक्यातील मायणीजवळ गुंडेवाडी हे गाव आहे. या गावात सर्वच समाज हा सकल मराठा आहे. नव्या नामकरणामुळे आता गुंडेवाडी नव्हे तर मराठानगर म्हणून या गावाची जगाला ओळख होणार आहे.गुरुवारी रात्री मायणी येथील सभा संपल्यावर मनोज जरांगे पाटील हे साडेअकराच्या सुमारास गुंडेवाडी गावात दाखल झाले. त्यांच्या शुभहस्ते या गावाचे मराठानगर असे नामकरण करण्यात आले. यावेळी जरांगे यांचे गावात ढोल, ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत ज्योतिबाचे दर्शन घेतले यानंतर त्यांची सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
येरळा नदीकाठी वसलेल्या या सदन गावची लोकसंख्या चौदाशे आहे. या गावांमध्ये सर्व मराठा समाजाचे लोक आहेत. गावाला ग्रामपंचायत असून त्यात सात सदस्य आहेत. विद्यमान सरपंच दिपाली शरद निकम आहेत. गुंडेवाडी नाव असूनही गावकऱ्यांच्या एकतेमुळे गावाने आदर्श गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. तसेच स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. गावात एक गाव, एक गणपती, एक दुर्गोत्सव, एक यात्रा असा गावाचा लौकिक आहे.मराठानगर हे राज्यातील पहिले नाव: मनोज जरांगे
राज्यातील हे पहिलं नाव असेल मराठानगर! तुमच्यासारखं आणि तुमच्या नावासारखं आणि गावासारखं बरोबर नाव तुम्ही शोधून आणल. तुम्हाला मार्क द्यावे तेवढे कमीच आहेत. तुमच्यासाठी बोलायला शब्दही अपुरे आहेत.
Users Today : 42