जालना : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. यावेळी एल्गार सभेचे आयोजक छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांनी आजच्या सभेत अंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवशी लाठीचार्ज झाला तेव्हा काय घडलं ते सांगितलं.छगन भुजबळ यांनी भाषणाच्या सुरुवातीलाचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण केलं. जालना जिल्ह्यात ६ जून १९९३ ला महात्मा फुले समता परिषदेची सभा झाली. त्या सभेत ओबीसी आरक्षण मंडल आयोग लागू करुन देण्याची मागणी केली. याच जिल्ह्यात ती मागणी पूर्ण करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिलं. मंडल आयोग हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला आणि ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मंडल यांचे सहकारी देशभर फिरले. आम्ही शरद पवार यांच्याकडे अंमलबजावणी केली. शरद पवार यांच्याकडे दुसऱ्या कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार नव्हते, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर तुरुंगात खाऊन आलो असं सांगतात, होय आलो. छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका, छगन भुजबळ यांनी केली.छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना भेटायला गेलेल्या मंत्री आणि न्यायमूर्तींच्या शिष्ठमंडळावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. जालन्यात लाठीचार्ज झाला तेव्हा प्रथम पोलिसांवर हल्ला झाला होता. मनोज जरांगे यांना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मध्यरात्री साडेतीन वाजता उठवून आणलं, असं भुजबळ म्हणाले.आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ७५ वर्ष झाली, दलित समाजाला संविधानानं आरक्षण दिलं, कलेक्टर झाले, आयपीएस झाले पण गरिबी दूर झाली नाही. ओबीसींची गरिबी दूर झाली नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत त्यांना वर आणायसाठी आरक्षण आहे, ते तर समजून घे, असं छगन भुजबळ म्हणाले.
Users Today : 26