मुंबई: मुंबईतील वायुप्रदूषणाच्या वाढलेल्या समस्येवर उपायांसाठी मुंबई महापालिकेने वेगवेगळी अस्त्रे उपसली आहेत. आज, सोमवारपासून मुंबईतील दररोज ५०० किमी रस्ते पाणी फवारणी करून धूळमुक्तीचा पर्याय अंगिकारला जाणार आहे. मात्र, डिसेंबरपासून सध्याच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १,००० किमी रस्ते धुण्याचे उद्दिष्ट पालिकेने बाळगले आहे.मात्र, या उद्दिष्टासमोर आव्हानांची मालिका असल्याने त्यात कितपत यश येईल, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या पालिकेकडून दिवसाकाठी २६० किमीचे रस्ते धुण्यासाठी पाणी फवारणी केली जात असून त्यासाठी सुमारे ५० टँकरचा वापर केला जातो. या परिस्थितीत वाढीव उद्दिष्टांमुळे पाण्याच्या टँकरची संख्या वाढवणे, रस्ते धुण्यासाठी मनुष्यबळाची गरज आदी आव्हाने उभी ठाकली आहेत. मुंबईतील २४ विभागीय कार्यालयांतील विविध रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी, हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी, धुळीचे अत्यधिक प्रमाण असलेल्या वाहनांतील संयंत्राद्वारे पाण्याची फवारणी सुरू आहे.मुंबईतील २४ वॉर्डांमधील ६० फुटांपेक्षा
अधिक रूंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुतले जात आहेत. रस्ते धूळमुक्त करण्याचे प्रमाण कमी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, पालिकेच्या नियोजनेनुसार १ डिसेंबरपासून दर दिवशी ५०० किमीच्या रस्त्यांवर पाणी फवारणी केली जाणार होती. त्यानंतर हेच प्रमाण एक हजार किमीपर्यंत निश्चित केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सोमवारपासूनच ५०० किमीच्या रस्त्यांवर पाणी फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १२५ ते १५० पाण्याच्या टँकरचा वापर केला जाणार आहे. तर, डिसेंबरपासून एक हजार किमीचे रस्ते धूळमुक्त केले जातील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Users Today : 23