मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करत आहे. राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाहीतर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्यांना सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली त्याला भाजपा सरकारच जबाबदार आहे. त्यांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, अंमलबजावणी मात्र काही होत नाही. खरेदी केंद्रे सुरु करण्याची घोषणा केली पण तीही अजून कागदावरच आहे. मुठभर व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकार खरेदी केंद्रे सुरु करण्यास टाळाटाळ करत असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. अशी सगळी भीषण परिस्थिती असताना सरकार ओबीसी-मराठा वाद लावण्यात व्यस्त असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
बावनकुळेंकडे जुगारासाठी कोट्यवधी रुपये कोठून आले?
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’..
भाजपाचे तिघाडी सरकार काँग्रेस सरकारच्याच योजना शासन आपल्या दारी म्हणून राबवत आहे. ही योजना म्हणजे महानौटंकी आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, एका कार्यक्रमाला तीन ते चार कोटी रुपये खर्च गेले जातात व ते पैसे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केला जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे कंत्राट हे ठाण्यातील एका व्यक्तीला दिले आहे, जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबवली पाहिजे, असं पटोले म्हणाले.मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ…
वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, नरेंद्र मोदी व भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
Users Today : 16