चराचरात, मन व्यक्त करण्याची कला, अनेकांगाने जाई,
कुणी भुंकून व्यक्त होई,
तर कुणी फुत्कारीत द्वेष दाखवून देई,
कुणी डरकाळी फोडी,
तर कुणी चित्कारुन जाणिव देई.!
इतरांसारखाच प्राणी, माणुस ही,
तो कडे कपारीत राही,
तर कधी झाडावर आसरा घेई,
शिकार करून, कच्चे मांस खाई,
रानटी अवस्था, त्याची साक्ष देई,
हिंस्रपणामुळे तो, त्यांच्यातील एक भासुन जाई.!
मात्र त्याचे वेगळेपण सर्वत्र दिसे,
त्याने शोधली, कला बोलण्याची, एकमेकांशी संवाद साधण्याची,
निर्मिती केली कैक भाषांची,
कळी फुलवली भाव भावनांची,
गरज भासली, टिपून ठेवण्याची.!
त्याने टाक बोरुची निर्मिती केली,
प्रेम, राग, द्वेष, आकस, स्वार्थ, परमार्थ, मनातील विविध रंग तरंगांची, कोंडी फुटली,
सुकलेल्या पानावर उमटू लागली,
तल्लख मेंदूने ही किमया साधली.!
योजिले त्याने नानाविध धर्म अन पंथ,
माणसाच्या सन्मार्गासाठी,
एक दुसर्याच्या सुखासाठी,
प्रेम, शांती, समृद्धी साठी,
गुण्यागोविंदाने राहण्यासाठी,
परस्परांतील स्नेहभाव वाढण्यासाठी.!
वर्तमानात कलीने उच्छाद मांडलाय,
धर्मांधतेने माणुस विकृत झालाय,
एकमेकांचा वैरी बनलाय ,
राजकारणाने धर्माचा ताबा घेतलाय,
त्याच्या पटला आड अराजक माजलय, अशांती चौफेर पसरलीय.!
स्त्रियांची दिवसाढवळ्या नग्न धिंड काढली जातेय,
कुमार्गाच्या धनाचे दान देऊन,
देवाला ही वश करू पाहिले जातेय,
वैर, द्वेष, संशय, दुजाभाव, स्वार्थ,
क्रूरतेने सीमा ओलांडलीय.!
हे सर्व कमी होते म्हणुन की काय,
जग तिसर्या महायुद्धाच्या मळभा खाली बेचिराख होऊ घातलय,
असं तर नाही ना ,आपण उच्च विद्या विभूषित असूनही ,
पूर्व अवस्थेतील रानटीपणाकडे कूच करू लागलोय.!
पूर्व अवस्थेतील रानटीपणाकडे कूच करू लागलोय.!!
पूर्व अवस्थेतील रानटी पणाकडे कूच करू लागलोय.!!!
अरूण निकम.
मुंबई,
9323249487.
Users Today : 16