नागपूर : विश्वकप भारताच्या हातून निसटला म्हणून भारतीय क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. मात्र, ‘हार-जीत चालायचीच’ म्हणत त्यांनी खिलाडूवृत्तीही दाखविली. अशा वातावरणात एक फोटो व्हायरल झाला अन् क्रिकेटप्रेमींचा उद्वेग समाजमाध्यमांतून झळकू लागला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्श मिशेल या विश्वचषकावर पाय ठेवून बसला आहे आणि बीअरची बाटली त्याच्या हातात आहे, असा तो फोटो आहे. ‘कप ओठांना लावायचा असतो राजा, पायाला नव्हे’, अशा शब्दांत क्रिकेटप्रेमींनी ऑस्ट्रेलियाच्या या उद्दामपणाचा निषेध केला.रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. प्रारंभी फलंदाजी करीत भारताने सुरुवात चांगली केली. मात्र, नंतर भारतीय संघ ढासळत गेला अन् चाहत्यांच्या आशाही. गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणातही भारताची फारशी कामगिरी चालली नाही. काहींना विजयाची आशा होती. काहींनी ती सोडून दिली होती. शेवटी भारतीय संघाचा पराभव झाला. तरी ‘अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणे म्हणजे गंमत नव्हे. हा खेळ आहे, इथे हार-जीत चालणारच’, असे संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले. पराभव चाहत्यांनीही स्वीकारला होता. मात्र, मार्श मिशेलच्या त्या छायाचित्राने त्यांची खपली निघाली अन् संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. मार्शचा विश्वचषकावर पाय ठेवून बसल्याचे छायाचित्र एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपसह विविध समाजमाध्यमे आणि वेबसाइट्सवरून प्रसारित होताच निषेधाच्या संदेशांचा पाऊस पडला. ‘तुम्ही मेहनत करून जिंकलेल्या ट्रॉफीची इज्जत तुम्हाला करता येत नसेल तर तुमचं जिंकणं व्यर्थ आहे’, असा आशयाचे संदेश सोमवारी दिवसभर फिरले. १९८३चा विश्वचषक आणि २०२३चा विश्वचषक अशी तुलनाही झाली. १९८३चा विश्वचषक कपिल देव यांनी डोक्यावर घेत उंचावला होता. ऑस्ट्रेलियननी तो पायाखाली घेतला, असेही प्रकर्षाने नमूद करण्यात आले.
इतर मीम्सही व्हायरल
घटना कोणतीही असो. नेटकरी त्यावर व्यक्त होतातच. शिवाय, सुपीक डोक्यांतून कितीतरी मीम्सही तयार होतात. भारत पराभवाच्या वाटेवर असताना ‘फटाके आता दिवाळीला फोडा’ असे सांगणारे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे मीम लगेत व्हायरल झाले. एका मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा आयोजकांना ‘ये दिखाने के लिये बुलाया क्या हमे’, असे विचारतानाचे मीम चर्चेत आहे. ‘ईडीची नोटीस पाठविली ऑस्ट्रेलियन टीमला’ असे शहा मोदी यांना सांगत आहेत, हे मीमही खुसखुशीत आहे. अशा काही मीम्सची सध्या समाजमाध्यमांवर धूम आहे.
शेवटची आशा रमेशभौ…
आपल्या ‘राजकीय’ वक्तव्यांनी समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झालेले, ‘राष्ट्रीय एकता विचारमंच’ या स्वत:च ‘स्थापन’ केलेल्या पक्षाचे स्वघोषित अध्यक्ष, वरुडचे रमेश खंडारे यांच्या मीमने तर तणावपूर्ण वातावरणातही हसू फुलविले. भारतीय संघाची घसरगुंडी सुरू असताना पायाला पॅड बांधत असतानाचे रमेशभौचे मीम व्हायरल झाले. सोबत लिहिले होते, ‘शेवटची आशा रमेशभौ…’ या मीमखाली चर्चा सुरू झाली, ‘विदर्भात आले अन् वरुडले जाऊन रमेशभौले भेटले नाही तर तुम्ही मंग काहीच केलं नाही…’