नागपूर –
नागपूर एमआयडीसी हद्दीतील संगम रोडवरील लेंजड रेस्टॉरंट अॅण्ड बार मध्ये बंदुकीच्या धाकाखाली खंडणी मागणाऱ्या कुख्यात टोळीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एका आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवरून फरार असलेल्या मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सदर टोळीचे मुख्य आरोपी अजित रमेश सातपुते (३७) असून, १३ मार्च रोजी त्याने सहा साथीदारांसह बारमध्ये प्रवेश करून बार मॅनेजरवर पिस्तूल रोखून खंडणी मागितली आणि २० हजार रुपये रोख व महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या हिसकावल्या.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ क्रमांक १) आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून वानाडोंगरी येथील एका घरावर धाड टाकून मुख्य आरोपीसह प्रीतम उर्फ मॅगी राम बोरकुटे (२२), हर्षल प्रमोद उपरीकर (१९) आणि बादल रत्नाकर गिरसावळे (२१) यांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्यांकडून एक विदेशी बनावटीची पिस्तूल, दोन जिवं काडतुसे, लोखंडी चाकू, फोल्डिंग स्टील रॉड, एक कार व ५० हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मुख्य आरोपी अजित सातपुते सराईत गुन्हेगार असून त्याला एका प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती. तो पॅरोलवरून फरार होता आणि वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
तपासात राकेश पट व अखिलेश पांडे यांनाही अटक करण्यात आली, तर एका विधिसंघर्षग्र बालकालाही ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे
Users Today : 16