मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने खरीप आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वादळात कापूस, मका, हरभरा आणि ज्वारी पिके आडवी पडली आहेत. विजांच्या कडकडाटासह रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होता. विभागात सोमवारी सकाळपर्यंत जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. विभागात १०७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून हिंगोलीत वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत विभागात ४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्याला दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिंगोलीत एक ठार, जनावरे दगावली
अवकाळी पावासाचा फटका हिंगोली जिल्ह्यालाही बसला आहे. चिमेगाव (ता. औंढा नागनाथ) येथील राजू शंकरराव जायभाये (वय ३२) या तरुणावर पहाटे वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. तर गोजेगाव येथील विष्णू सीताराम नागरे (वय २५) हा तरुण जखमी झाला आहे, अशी माहिती विभागीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. वीज पडून विभागात लहान २३ आणि मोठी नऊ अशी एकूण ३२ जनावरे दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ, जालन्यात १८, हिंगोलीत तीन आणि नांदेडमधील तीन जनावरांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात ३२ मंडळात अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. जिल्ह्यातील ३२ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. उस्मानपुरा, भावसिंगपुरा, कांचनवाडी, चौका, कचनेर, पंढरपूर, आडूळ, बिडकीन, पाचोड, मांजरी, भेंडाळा, तुर्काबाद, वाळूज, डोणगाव, आसेगाव, शिवूर, गारज, महालगाव, जानेफळ, कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, वेरुळ, सुलतानपूर, बाजारसावंगी, गोळेगाव, आमठाण, बोरगाव आणि फुलंब्री या मंडळांचा त्यात समावेश आहे.
Users Today : 11