तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गंगापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (६) रोजी दुपारी १२:३० वाजता तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या अनोख्या आंदोलनांने प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधले.
तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवावा,पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतीच्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रिम विमा नुकसाभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने गंगापूर तहसील परिसरात फटाके फोडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अचानक जोरदार आवाजाचे फटाके फुटल्याने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले, माजी सभापती विनोद काळे, अण्णासाहेब जाधव,राहुल सुराशे, महेश गुजर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.