पुणे : सुप्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तब्बल ११६ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधी दरम्यान हा प्रकार कोंढवा येथील टिळेकर नगरमध्ये असलेल्या सिंहगड सिटी स्कूलमध्ये घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत.आरोपी मारुती निवृत्ती नवले हे सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक आहेत. या शाळेमधील साधारण ११६ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपयांची एकूण कपात करून घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख ७५ हजार ७७४ रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे.उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा दावा आहे. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Users Today : 11