काटेवाडी, ता. १ : यंदा निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हॉर्टीनेट प्रणालीवर शेतनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या ती अल्प झाली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत निर्यातक्षम पिकासाठी एकूण केवळ ७७२ शेतनोंदणी झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.निर्यातक्षम द्राक्ष व आंबा फळ पिकाची नोंदणी २०२३-२४ मध्ये सुरू झाली आहे. इतर पिकांची नोंदणी वर्षभर सुरू असते. फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी सन २००४-०५ पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान मागील वर्षी हॉर्टिनेट प्रणालीवर ७३ हजार ५६५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती.गतवर्षी २०२२-२३ मध्ये झालेली शेत नोंदणी
द्राक्षासाठी ग्रेपनेट ४६ हजार ९७
आंब्यासाठी मँगोनेट ………… ९ हजार ९९१
भाजीपाल्यासाठी व्हेजनेट ………… ८ हजार २५
सन २०२३-२४ मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्याकरिता १.२५ लाख लक्षांक जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सद्य स्थितीत शेतनोंदणी अत्यंत अल्प झाल्याचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेतनोंदणी संबंधित प्रणालीवर करावी.
– डॉ. कैलास मोते, फलोत्पादन संचालक, कृषी आयुक्तालय
निर्यातक्षम पिकांसाठी हार्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करणे गरजेचे असते. निर्यातक्षम पिकांची नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रणालीवर शेताची नोंदणी करणे गरजेचे आहे.
– संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक
नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
अ) विहित पपत्रात अर्ज
ब) ७/१२ उतारा
क) बागेचा नकाशा
ड) तपासणी अहवाल प्रपत्र (४ अ)
अशी होते नोंदणी
सर्व माहिती संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मंडळ कृषी अधिकाऱ्यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करून (४ अ) मध्ये तपासणी अहवाल तयार केला जातो. शेतकऱ्यांचा प्रस्ताव नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येतो. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एक वर्षाकरिता निर्यातीकरिता नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. नोंदणी प्रमाणपत्रात कायमस्वरूपी नंबर देण्यात येतो. नोंदणी क्रमांकामध्ये राज्य कोड, जिल्हा कोड, तालुका कोड, गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाइनद्वारे करण्यात येते.
नोंदणीकृत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
* बागेतील कीड व रोगांचे नियंत्रणाकरिता आरएमपी व शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे
* मुदतबाह्य व बंदी घातलेल्या औषधांचा वापर न करणे.
*एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
* उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेतल्यानंतर औषधाची फवारणी न करणे.
* खरेदी केलेल्या सर्व औषधे व खतांची नोंदणी ठेवणे.
* उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेण्यापूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडून निर्यातक्षम डाळिंब बागांची (४अ) मध्ये तपासणी करून घेणे.
शेतकऱ्यांना खालील बाबींवर लक्ष देणे गरजेचे
– पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरिता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/बुरशीनाशके) वापर करण्यात यावा.
– औषधांची फवारणी शिफारस केलेल्या मात्रेत व योग्यवेळी व योग्य प्रमाणात करणे.
– युरोपियन कमिशन/कोडेक्स अलीयेनटीसीस कमिशन यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरित अंशाचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
– औषधांची फवारणी प्रशिक्षित व्यक्तीद्वारे व योग्य त्या मात्रेत योग्य पद्धतीने करावी.
– फळाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते याचा तपशील ठेवणे.
– कीड व रोगांचे नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या औषधांची खरेदी ही अधिकृत कीटकनाशक विक्रेत्याकडून रितशीर पावती घेऊन करावी.
– निर्यातक्षम बागेतील रँडम पद्धतीने नमुना काढणीच्या एक महिना अगोदर घेऊन त्यामधील अंश तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठविताना नमुन्यासोबत फवारणी शेड्यूलची माहिती देण्यात यावी.
– उर्वरित अंश प्रयोगशाळेतील उर्वरित अंशचे प्रमाण विहित मर्यादेच्या आत असेल तरच निर्यातीकरीता शिफारस करावी.