आले आले नव वर्ष
भोंपु वाजे दारोदारी
त्वरा करा चलाचला
पत्रके वाटी घरोघरी
बंपर डंपर महासेल
करून बसा उधारी
उड्या मारती माकडे
मजा करतात मदारी
बारीक होती ग्राहक
फुगत जाती व्यापारी
मापात करुन पाप ते
सहज फसवे मापारी
लुभावती जाहिराती
दोन फुकट एकावरी
भरमसाठ खरेदी ती
गरज मुळी नसे जरी
आंत मध्ये वस्तू जुनी
वेस्टणे वरी भरजरी
पगार बोनस संपला
महिना रेटा कसातरी
ऑनलाईन खरेदी ती
तिची भिन्न अदाकारी
फसवणूक नित्य होई
फसत राहे पुन्हा तरी
दिवाळे काढे दिवाळी
आम्हाला हौस भारी
पुढचा सण जोरदार
शिमगा करतो नंतरी
Users Today : 14