पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत आणखी एक ऐतिहासिक प्रयोग करताना विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चांद्रकक्षेत पोचवणाऱ्या प्रॉपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत परत आणले. या प्रयोगाद्वारे ‘इस्रो’ने भविष्यातील मोहिमांसाठीची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे.विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरल्यापासून प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राभोवतीच्या १०० किलोमीटरच्या कक्षेत फिरत होते. त्यावर बसवलेल्या ‘शेप’ या वैज्ञानिक उपकरणाच्या साह्याने पृथ्वीच्या वातावरणाच्या नोंदी घेण्यात आल्या. मोहिमेतील सर्व वैज्ञानिक नोंदींचे काम पूर्ण झाल्यानंतर विक्रम लँडरचा चंद्रावर उडी मारण्याचा प्रयोग (हॉप) यशस्वी करून ‘इस्रो’ने भविष्यातील चंद्रावरून पृथ्वीवर परत येणाऱ्या मोहिमांसाठी महत्त्वाची चाचणी पार पाडली होती.आता प्रॉपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे परत आणून ‘इस्रो’ने चांद्रयान-४ मोहिमेची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. ‘इस्रो’कडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ऑक्टोबरमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूलला पृथ्वीभोवतीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू झाली. १० नोव्हेंबरला प्रॉपल्शन मॉड्यूलने चंद्राचे गुरुत्वीय प्रभाव क्षेत्र सोडले. २२ नोव्हेंबरला पृथ्वीभोवतीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत असताना प्रॉपलशन मॉड्यूलने पृथ्वीजवळचा बिंदू ओलांडला. प्रॉपल्शन मॉड्यूल आता पृथ्वी भोवतीच्या कक्षेत सुरक्षित असून, त्यावरील शेप उपकरणही अपेक्षेप्रमाणे काम करीत आहे.’
या प्रयोगातून इस्रोने चंद्राच्या कक्षेतून यानाला सुरक्षित आणण्यासाठीच्या विविध सॉफ्टवेअर यंत्रणांची तपासणी यशस्वी केली. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत येताना कोणत्याही उपग्रहाला प्रॉपल्शन मॉड्यूल धडकणार नाही याची काळजी घेण्यात आली. या प्रयोगातून मोहिमेचा कालावधीही वाढल्याचे ‘इस्रो’चे म्हणणे आहे.