नागपूर : पाणी स्वच्छतेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने डायरियासारख्या आजाराने जगभरात दरवर्षी ४ लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील उपप्रमुख डॉ. पेडेन यांनी दिली. नीरीतर्फे आयोजित जलव्यवस्थापनावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.जागतिक स्तरावर चारपैकी एका व्यक्तीला पिण्याचे सुरक्षित पाणी मिळत नाही. पाचपैकी दोघांकडे स्वच्छतेचे व्यवस्थापन नाही. त्यामुळे डायरियासारखे आजार वाढत आहेत. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे काम केले जात असल्याचे डॉ. पेडेन यांनी सांगितले. जलवायू परिवर्तन अनुकूल होण्यात पाण्याची मोठी भूमिका आहे. जागतिक जलवायू संकटाचा पाण्याशी थेट संबंध आहे, असे या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी नीरीचे माजी संचालक डॉ. सुकुमार डिनोट्टा म्हणाले. या शतकाच्या अखेरपर्यंत ग्लोबल वार्मिंग ४ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढण्याचा धोका आहे. असे झाले तर माणसाचे जिवंत राहणे कठीण होईल. भारत भूजल पुनर्भरणासाठी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे जमिनीच्या पुनर्भरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे याबाबत काय करता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही डॉ. डिनोट्टा यांनी सांगितले.
प्रास्ताविक मुख्य वैज्ञानिक डॉ. पवनकुमार लाभशेटवार यांनी केले. डॉ. पारस पुजारी यंनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शालिनी ध्यानी यांनी केले. आभार डॉ. जी. के. खडसे यांनी मानले.