महाराष्ट्रातील नद्यांबाबत चिंताजनक माहिती; प्रदूषणात देशात पहिला नंबर, सर्वात प्रदुषित नदी कोणती?

Khozmaster
2 Min Read

नागपूर : औद्योगिक क्रांती व अर्थिक प्रगतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे दावे अनेकदा होतात. अनेकदा विविध अभ्यासांतूनही त्याची पुष्टी झाली आहे. मात्र, नद्यांच्या प्रदूषणातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचा एक अभ्यास समोर आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून हे चिंताजनक सत्य समोर आले आहे.
-मंडळाने अलीकडेच देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित केला. नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ राबविला जातो. यात पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव यांचा अभ्यास केला जातो.

-विशेषत: पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरातील नद्यांमधील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते. यापूर्वी २०१८मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता.

-त्यात ३५१ नद्यांचे काही पट्टे प्रदूषित जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यात देशातील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत.

-तसेच देशातील २८ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ पैकी ३११ नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली. यात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित नद्या असल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण ५५ नद्या प्रदूषित आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कन्हानची स्थिती वाईट

महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेशातील १९, बिहारमधील १८, केरळमधील १८ आणि कर्नाटकातील १७ नद्या प्रदूषित आहेत. २०१९ आणि २०२१ यादरम्यान महाराष्ट्रातील ५५ नद्यांचे १४७ ठिकाणी घेतलेले नमुने प्राणवायू मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भीमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पावना, नागपूर जिल्ह्यातील कन्हान तसेच मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या. ‘उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याची गांभीर्याने तपासणी करत नाही. उद्योगातील घातक रसायने आणि सांडपाणीही नदीप्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत’, असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *