नागपूर.मागील महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. शेतीकामांना वेग येताच मंगळवारी (ता. पाच) सकाळपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले असून शेतात उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी त्यांची धावपळ सुरू झालेली असल्याचे दिसून येत आहे.
आगामी २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे सत्र कायम असून त्याचा मोठा परिणाम शेतपिकांवर होत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती.
वातावरणात या काळात मोठा गारठा निर्माण झाला. पावसासह धुकेही पडल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झालेला दिसून आला. शेतशिवारातील कापूस पीक ओलेचिंब झाले. परिणामी, कापसाच्या प्रतवारीवर परिणाम झाला. या अवकाळी पावसामुळे पांढरे सोने पिवळे पडले. तुरीचा फलोरही गळाल्याने उत्पादनाची आशाही मावळली.
आता डिसेंबर उजाडला. तरीदेखील पाऊस पाठ सोडायला तयार नाही. हे संकट कायम घोंगावत असून यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे विदर्भासह संपूर्ण राज्यात पावसाचे सत्र सुरू आहे. येत्या २४ तासांत पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतातुर दिसून येत आहेत. गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे त्यात खंड पडत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर उजाडूनही थंडीचा जोर वाढलेला नाही.‘मिचांग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेश, तामिळनाडूच्या सीमेवर धडकले आहे. परिणामी, तेथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेही विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. म्हणून आगामी २४ तासांत पावसासह गारपिटीची शक्यता आहे.— सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक, ग्रीन पलॅनेट सोसायटी.