ससूनमधून पदमुक्त होण्याची डॉ. संजीव ठाकूर यांना आधीच कुणकुण? डॉक्टर मुलाचाही त्याच दिवशी राजीनामा

Khozmaster
3 Min Read

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याच दिवशी त्यांच्या मुलाने शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी) विभागातील सहायक प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा स्वत: डॉ. संजीव ठाकूर यांनी त्याच दिवशी मंजूर केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. ‘ससून’मधील गोंधळ पाहता आपल्याला पदमुक्त केले जाईल, ही कुणकुण डॉ. संजीव ठाकूर यांना लागली होती का, या चर्चेला ऊत आला आहे.डॉ. अमेय ठाकूर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कंत्राटी स्वरूपात (डीएसबी) कार्यरत होते. डीएसबी स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना असतात. त्यामुळे डॉ. ठाकूर यांनी आपल्या मुलाचा राजीनामा तडकाफडकी मंजूर केल्याचे दिसून येत आहे. डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा आणि डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्याचा निर्णय १० नोव्हेंबरला रात्री उशिरा घेण्यात आला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मुदतीच्या आत बदली झाल्याने त्यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा’कडे (मॅट) धाव घेतली होती. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि १० नोव्हेंबरलाच डॉ. काळे यांच्या बाजूने निर्णय लागला. सर्व निर्णय विरोधात गेल्यामुळे १० नोव्हेंबरलाच डॉ. ठाकूर यांच्या मुलाने राजीनामा दिला.

डॉ. ठाकूरांच्या अडचणीत वाढ का?

ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील पळून गेल्यानंतर येरवडा कारागृहातील काही निवडक कैद्यांची रुग्णालयात बडदास्त ठेवली जात असल्याचे समोर आले. ललितवर स्वत: डॉ. संजीव ठाकूर उपचार करीत होते. ललित पाटीलला इतके दिवस दाखल का करून घेतल्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने डॉ. ठाकूर यांच्या अडचणीत आले आहे.

‘डीएसबी’द्वारे नियुक्ती कशी केली जाते?

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता भासू नये, म्हणून काही जागा कंत्राटी (डीएसबी) स्वरूपात भरण्याचे अधिकार रुग्णालयाला असतात. डॉ. अमेय ठाकूरदेखील कंत्राटी स्वरूपात (डीएसबी) कार्यरत होते. यासाठी विभागीय निवड समिती असते. या समितीचे अध्यक्ष अधिष्ठाता असतात. या समितीमार्फत नियुक्तीचे प्रक्रिया केली जाते. यानंतर निश्चित उमेदवाराचे नाव मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवले जाते. मान्यतेनंतर त्यांना सेवेत घेतले जाते. सुरुवातीला तीन महिन्यांचे कंत्राट दिले जाते. त्यानंतर अकरा महिन्यांचे कंत्राट दिले जाते. नियुक्ती करताना संबंधित उमेदवार हा त्या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यास प्राधान्य दिले जाते. डॉ. अमेय ठाकूर यांचे शिक्षण बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात झालेले नाही. डॉ. संजीव ठाकूर यापूर्वी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता असताना तिथेही डॉ. अमेय यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात अधिष्ठातापदी आल्यावर डॉ. अमेय यांची नियुक्ती करण्यात आली.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *