लोक मरतायेत, त्यांची घरं पाण्यात बुडतायेत, आणि तुम्ही पाच वर्षे फाइलींवर बसता, उच्च न्यायालयाने झापले

Khozmaster
2 Min Read

 नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर विकासकामांसाठी पैसा आहे, पण जनतेच्या सुरक्षेसाठी काय तरतूद होते आहे, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला तोंडी फटकारले.शहरात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शहरातील या परिसरात पूर आला. स्थानिकांचे मोठे नुकसान झाले. या परिसरातील रहिवाशी रामगोपाल बचुका, जयश्री बनसोड आणि नत्थुजी टिक्कस यांनी अॅड. तुषार मंडलेकर यांच्यामार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हा पूर या परिसरातील अवैध बांधकामांमुळेच आला. त्यामुळे ती बांधकामे हटविण्यात यावीत. अंबाझरी येथील विवेकानंद स्मारकामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे स्मारकसुद्धा हटविण्यात यावे, अशा विविध मागण्या या याचिकेमार्फत करण्यात आल्यात.

मनपा, मेट्रो, राज्य सरकार, सिंचन विभागाने सविस्तर उत्तर दाखल करावं

रहिवाशांना पाच लाख, तर दुकानदारांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई दिली जावी, तसेच अंबाझरी तलाव व या परिसरातील नियोजन तसेच विकासाशी निगडित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या याचिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अतुल मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रशासनाला तोंडी फटकारले. तलावाच्या संरक्षणासाठी काय केले याबाबत मनपा, मेट्रो, राज्य सरकार, सिंचन विभागाने २० डिसेंबरपर्यंत सविस्तर उत्तर दाखल करावे, असे आदेश दिले.

पाच वर्षे फाइलवर बसता..

अंबाझरी तलावाच्या सुरक्षेबाबत २०१८ साली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने तलावाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विविध आदेश दिले होते. यातील सर्व आदेशांची पूर्तता झालेली नसल्याचे यावेळी न्यायालयासमोर आले. यात मनपा व मेट्रोनेच निधी दिला मात्र, राज्य सरकारने निधी दिलाच नाही, असा दावा मनपाकडून करण्यात आला. यावर ‘लोक मरत आहेत. त्यांची घरे पाण्यात बुडत आहेत आणि पाच वर्षे फाइलवर बसता’ अशा शब्दांत न्यायालयाने तोंडी नाराजी व्यक्त केली.

0 8 9 4 5 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *