बुलडाणा, (जिमाका): मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्याक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेतंर्गत अशा प्रकारच्या सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सन २०२३-२४ या वर्षासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज http://swadharyojana.com या लिंक वर जावून अथवा QR code स्कॅन करून भरावा व विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
**