मिरज : वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याने दोघांमधला संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गत दहा वर्षांतील आकडेवारीही यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांना जीव गमवावा लागला. आठ जण गंभीर जखमी झाले, तर ३९ जण किरकोळ जखमी झालेत.शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले अधिक होत असल्याने शेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांनी वन विभागाकडे माहिती अधिकारात हल्ल्यांबाबत माहितीची विचारणा केली होती. एप्रिल २०१३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यानची प्राप्त माहिती धक्कादायक आहे. कडेगाव, शिराळा तालुक्यात प्रामुख्याने बिबट्या, तरस, रानडुकरांच्या हल्ल्यांची नोंद अधिक आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना आणि जखमी झालेल्यांना शासनाकडून ९३ लाख ५७ हजारांची भरपाई मिळाली आहे. मृतांत सांगली शहर परिसरात ६, कडेगाव ३, आटपाडी आणि शिराळा प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. कडेगावात १६, शिराळ्यात १५, सांगलीत १२, तर आटपाडीत ११ हल्ल्याच्या घटना घडल्याची नोंद वनविभागाकडे आहे.