दादा, आमच्याबद्दल हे बोलणं बरं नव्हं! अजित पवारांच्या वक्तव्याचा पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकडून निषेध

Khozmaster
2 Min Read

‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ विधान परिषदेतील या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध केला. समाज माध्यमांवर पवार ट्रोल झाले असून, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील, यावर मंगळवारी (ता. १२) चर्चा झाली. विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाईल. असा निर्णय सरकारने घेतला आहे. ही संख्या वाढवावी.’’ या मागणीवरून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’पवार यांनी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यासंदर्भात जे अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्याचा राज्यातील समस्त उच्चशिक्षित विद्यार्थी तीव्र शब्दांत निषेध करत आहेत, अशी भावना संशोधक विद्यार्थी नितीन आंधळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सारथी, बार्टी, महाज्योती या संस्था फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने स्थापन झाल्या आहेत. या संस्थांची स्थापना संशोधनाला चालना देण्यासाठी झाली आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मराठा, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती समाजातील विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या फेलोशिपसाठी सरकारविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना न्याय द्यायचे सोडून अपमानजनक टिप्पणी करणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला विशेष महत्त्व दिले आहे. असे असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी वादग्रस्त विधान करणे चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. सर्व संस्थांमार्फत सरसकट शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आम्ही ठाम असून राज्यभर लढा उभारत आहोत.

– राहुल ससाणे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

0 9 4 7 0 0
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *