पुणे – भारतीय जनता पक्षाचे १० हजार रामसेवक २ लाख घरांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मंगल अक्षता पोचविणार आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.श्रीराम मंदिराबाबत झालेल्या बैठकीत घाटे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्री रामाचे मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना २२ जानेवारीला खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. या मंदिराचे भव्य पुनर्निर्माण हा एक संपूर्ण देशासाठी गौरवशाली क्षण असून त्या दिवशी संपूर्ण भारतात तसेच जगात दिवाळीचे वातावरण असेल.
या घटनेच्या निमित्ताने शहर भाजप संपूर्ण ताकदीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असून मतदारसंघ निहाय नियोजन बैठका घेण्यात होणार आहेत. तसेच १ ते १५ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन होईल.’ या सोहळ्यात पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे यासाठी पक्षाचे १० हजार कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले, सहकार्यवाह महेश पोहोनेरकर, धनंजय काळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रीय पदाधिकारी मेधा कुलकर्णी , पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्ष डहाळे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रवक्ते संदीप खर्डेकर, हेमंत रासने, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भांडारे, वर्षा तापकीर, सुभाष जंगले यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.