“राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असे विधान करणे चुकीचे” पवारांच्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध

Khozmaster
2 Min Read

पुणे – ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ या विधानपरिषदेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले असून, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर मंगळवारी (ता. १२) चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, ‘सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते.

परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल’, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’

अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यासंदर्भात जे अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्याचा महाराष्ट्रातील समस्त उच्च शिक्षित विद्यार्थी तीव्र शब्दात निषेध करत असल्याची भावना संशोधक विद्यार्थी नितीन आंधळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सारथी, बार्टी, महाज्योती या संस्था फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने स्थापन झालेल्या आहेत. या संस्थांची स्थापना संशोधनाला चालना देण्यासाठी झाली आहे.

परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मराठा, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती समाजातील विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या फेलोशिप साठी सरकार विरुद्ध लढा देत आहे. त्यांना कुठेतरी न्याय द्यायचे सोडून अशा प्रकारे अपमानजनक टिप्पणी करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.’

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. असे असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करणे चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. सर्व संस्थांमार्फत सरसकट शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आम्ही ठाम असून, राज्यभर लढा उभारत आहोत.

– राहूल ससाणे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *