मुंबई : मुंबई-जालनादरम्यान आठ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंडळाने सहा वंदे भारत गाड्यांचे वितरण केले आहे. मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला एक वंदे भारत देण्यात आली आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पासाठी वंदे भारतवर शिक्कामोर्तब केल्याने आता काश्मीर खोऱ्यातूनही वंदे भारत धावणार आहे.
संत रामदासस्वामींचे जन्मस्थळ, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामींचे मंदिर आणि अन्य तीर्थक्षेत्र जालन्यात आहेत. येथे जाणाऱ्या मुंबईकरांना जालन्यासाठी जलद आणि आरामदायी पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. वंदे भारतची ४४ आणि ४६वी आठ डब्यांची गाडी मध्य रेल्वेला देण्यात आली आहे. एक गाडी मुंबई-जालना मार्गावर धावणार आहे. गाडीचे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. एकूण आठ डब्यांच्या चार आणि १६ डब्यांची एक अशा पाच वंदे भारतचे (वंदे भारत गाडी क्रमांक ४४ ते ४९) वितरण करण्यात आले आहे. उंच पेंटोग्राफ असलेली पहिली वंदे भारत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. उत्तर रेल्वेवरील यूएसबीआरएल प्रकल्पासाठी एका वंदे भारत राखीव ठेवण्यात येत आहे, असे आदेश रेल्वे मंडळाच्या कोचिंग विभागाचे सहसंचालक ऐश्वर्य सचान यांनी दिले आहेत.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्वात आधी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर रेल्वेच्या अखत्यारितील यूएसबीआरएल प्रकल्प साधारण जानेवारी २०२४मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे. यासाठी वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला होता. प्रकल्पासाठी आठ डब्यांची वंदे भारत देण्यात आली आहे.