किरकटवाडी – सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या जयप्रकाश नारायण नगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयात काल दुपारी विषारी साप दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शौचालया अभावी गैरसोय होत असून पालिका प्रशासन शौचालयाच्या नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे असे म्हणत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
जयप्रकाश नारायण नगर वसाहतीत सुमारे दोन ते अडीच हजार लोकवस्ती असून तत्कालीन नांदेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वस्तीतील बहुतांश नागरिक या सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. नियमित स्वच्छता होत नसल्याने शौचालयात अत्यंत दुर्गंधी येत असून आजूबाजूला ही अस्वच्छता आहे.पुरुषांसाठी असलेल्या दहापैकी नऊ शौचालयांचे दरवाजे काही समाजकंटकांनी तोडून टाकलेले असून त्याच अवस्थेत नागरिकांना या शौचालयाचा वापर करावा लागत आहे. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागरिक कुमार दुपारगुडे यांना शौचालयात विषारी नाग दिसून आल्यानंतर त्यांनी सर्व नागरिकांना याची माहिती दिली. तेव्हापासून वस्तीतील नागरिक या विषारी सापाच्या भितीने शौचालयात जाण्यास घाबरत असून सर्वांना गैरसोय सहन करावी लागत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनाही धोका
शौचालयाला लागूनच जिल्हा परिषदेची शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थीही याच शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला असल्याने पालिकेने शौचालयाच्या स्वच्छतेबाबत व डागडुजीबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.’दोन दिवसांपासून सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.’
– शुभम शिंदे, नागरिक’शौचालयाची वेळेवर स्वच्छता करण्यात येत नाही. लाईटची व्यवस्था नसल्याने अंधार असतो. दरवाजे तुटलेले आहेत. एका बाजूला भगदाड पडलेले आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी म्हणजे गांभीर्य कळेल.’
– बाबासाहेब कांबळे, नागरिक.’संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तातडीने सर्पमित्र बोलवण्याची व्यवस्था करण्यात येईल. मागील वर्षी शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु येथील काही नागरिक मोडतोड करतात. पाहणी करुन पुन्हा आवश्यक दुरुस्ती करून घेण्यात येईल.’
– प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.