४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?

Khozmaster
3 Min Read

नागपूर : भारतीय अन्न महामंडळाकडे जवळपास ४०० लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाचा साठा आहे. यंदाच्या हंगामातील सुमारे १,०८० लाख मेट्रिक टन तांदूळ नव्याने जमा होईल. कुठल्याही परिस्थितीत देशात तांदळाची टंचाई होण्याची चिन्हे नसताना सरकारने नॉन बासमतीवर जुलै महिन्यात निर्यातबंदी लावली. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २७ हजार तांदूळ उद्योग संकटात सापडले आहेत. फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अहवालातून हे तथ्य समोर आले आहे.

देशात २०२२-२३मध्ये साधारणत: बासमतीचे १६० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. यातील देशांतर्गत बाजारात ११० लाख मेट्रिक टन विक्री झाली. ४७ लाख मेट्रिक टन परदेशात निर्यात करण्यात आला. तरीही तीन लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ शिल्लक राहिला. विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात उत्पादित होणाऱ्या नॉन बासमती (बॉइल्ड) तांदळाचा विचार करता २१० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. देशांतर्गत बाजारात १३० लाख मेट्रिक टन विक्री होऊन ८० लाख मेट्रिक टन परदेशात निर्यात करण्यात आला. नॉन बासमती (कच्च्या) तांदळाचे ७१० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. यातील ५५० लाख मेट्रिक टन तांदळाची देशांतर्गत बाजारात, तर ६५ लाख मेट्रिक टन तांदळाची निर्यात झाली. अजूनही ९५ लाख मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. ब्राउन राइस (विनापॉलिश)चे १० लाख मेट्रिक टन उत्पादन होऊन देशांतर्गत बाजारात पाच लाख मेट्रिक टन विक्री झाली. उर्वरित पाच लाख मेट्रिक टन परदेशात निर्यात करण्यात आल्याचा दावाही अहवालातून करण्यात आला आहे.देशातील जवळपास ७० टक्के लोकांना सरकार रेशनमधून अतिशय अल्प दरात तांदूळ उपलब्ध करून देते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात तांदळाचे दर वाढण्याची शक्यता नाही. ‘बॉइल्ड राइस’ची देशांतर्गत बाजारातील विक्री केवळ दहा टक्के आहे. उर्वरित निर्यात होतो. परिणामी या तांदळाच्या किमतीही वाढ होण्याची कुठलीही शक्यता नाही. सुमारे १४५ लाख मेट्रिक टन नॉन बासमती तांदळाची निर्यात थांबल्याने परदेशी चलनप्राप्तीवरही अडसर निर्माण झाल्याचा दावा फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी केला आहे. तांदळावरील निर्याबंदी हटविण्यात यावी, ‘बॉइल्ड राइस’वरील २० टक्के निर्यात कर रद्द करावा, हे शक्य नसल्यास ५० डॉलर प्रती टन इतका निश्चित निर्यात कर लावला जावा, अशी राइस मिलर्सची मागणी आहे.नेमके काय घडतेय?

– देशभरात जवळपास १,२५० लाख मेट्रिक टन नॉन बासमती धानाचे उत्पादन होते.
– यातील ८०० मेट्रिक टन किमान आधारभूत दराने सरकारी केंद्रावर खरेदी केले जाते.
– उर्वरित ४५० लाख मेट्रिक टन राइस मिलर्सकडून सरकारी दरापेक्षा अधिक दराने खरेदी केला जातो.
– सरकारने निर्यातबंदी लादल्याने भारताकडून तांदूळ खरेदी करणारे देश दुसऱ्यांकडून आपली गरज भागवून घेत आहे.

आकडे बोलतात…

– देशातील एकूण उत्पादन : १,०९० लाख मेट्रिक टन
– देशांतर्गत बाजारात विक्री : ७९५ लाख मेट्रिक टन
– परदेशातील निर्यात : १९७ लाख मेट्रिक टन
– शिल्लक : ९८ लाख मेट्रिक टन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *