अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवस दिवाळी म्हणून साजरा करा

Khozmaster
2 Min Read
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवस दिवाळी म्हणून साजरा करा
आ. शिवेंद्रसिंहराजे; साताऱ्यात पवित्र अक्षता, पत्रिकांचे वाटप केले सुरु
सातारा- दि. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे हिंदूच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. सुमारे ५०० वर्षानंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सातारा शहरासह जिह्यातील जनतेने या उत्सवात सहभागी व्हावे. आपल्या नजीकच्या कोणत्याही मंदिरात जाऊन पवित्र अक्षता अर्पण कराव्यात, घरोघरी दिवे लावावेत आणि हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा शहरात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारकर नागरिकांना घरोघरी जाऊन अयोध्येतून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षता वाटप आणि निमंत्रण पत्रिका देऊन २२ जानेवारीच्या श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचे आमंत्रण देण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे पाटील, विकास गोसावी, धनंजय जांभळे, सचिन तिरोडकर, चंदन घोडके, सचिन भोसले, मुकुंद आफळे, श्रीधर कुलकर्णी, विजय फडके, रवी गायकवाड यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वयंसेवक आपल्या घरी अक्षता देण्यासाठी येतील, त्याचा स्विकार करावा. या अक्षता देवासमोर ठेऊन त्यांची रोज पूजा करावी. प्रत्येक मंदिरात २२ जानेवारी रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत धार्मिक कार्यक्रम घ्यावेत. भजन, कीर्तन, पाठ यामध्ये सामील व्हावे. गोडधोड जेवण करावे. घरासमोर रांगोळी काढावी, घरोघरी दिवे लावावेत, मंदिरे सजवावीत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. दि. २२ रोजी आपल्याला मिळालेल्या अक्षता थोड्या आपल्या घरातील देव्हाऱ्यात वहाव्यात आणि आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्तीवर किंवा श्रीरामाच्या फोटोवर वहाव्यात, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *