आज (६ जानेवारी) बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती / मराठी पत्रकार दिन…
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावात झाला. बाळशास्त्री हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचे संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांच्या काळात ब्रिटिशांनी सारा भारत आपल्या अंमलाखाली आणत जनतेवर अनेक बंधने लादली. ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध आपले विचार मांडण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे, याची जाणीव हळूहळू भारतीयांना होऊ लागली. अशा परिस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली.
जांभेकर यांच्या नंतरच्या काळात वृत्तपत्र हे वैचारिक क्रांतीचे महत्त्वाचे साधन बनले. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, माधव गडकरी आदींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. वृत्तपत्रे लोकजागृती करतात, त्यामुळे समाजाची नीतिमत्ता सुधारते. सत्ताधाऱ्यांवर नैतिक अंकुश राहतो. आज मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्रासह गोव्यातच नव्हे, तर जगाच्या अनेक भागात पोहोचली आहेत. या प्रगतीचे श्रेय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना द्यायलाच हवे. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ ६ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…