खोज मास्टर-न्युज ब्युरो
खासदार प्रतापराव जाधव,आमदार रायमूलकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या ई रिक्षा.
कुतूहल म्हणून खा.प्रतापराव जाधवांनी ई रिक्षा चालवून लुटला आनंद..
मेहकर :- मेहकर येथील “न भूतो न भविष्यती”अशा प्रकारच्या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनास दोन दिवसात बुलढाणा वाशीम जिल्ह्यातील ५० हजार जणांनी भेट दिल्याची विक्रमी नोंद झाली आहे.विविध प्रकारचे २५० स्टॉल आणि कृषी संबंधित व्याख्याने हे कृषी मेळाव्याचे मोठे आकर्षण होते.प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी रोजी तांत्रिक मार्गदर्शन आणि चर्चासत्र पार पडले .
यात हिवरखेड येथील दादाराव हटकर यांनी पूरक व्यवसाय शेळीपालन या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की,शेळीच्या पौष्टीक दुधाला औषध म्हणून खूप मागणी असून १०० रुपये लिटर प्रमाणे दुधविक्री होते.खताची उपलब्धी होते.शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून तो करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.प्रत्येकाने किमान एक शेळी पाळावी आणि एक झाड लावावे.विशेषतः शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांनी शेळीपालन व्यवसायात उतरावे.
रुंद वरंबा आणि सरी पद्धतीचा अवलंब करा -दिलीप फुके..
मुख्य सभामंडपात व्याख्यान देतांना वाशीम येथील दिलीप फुके यांनी रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने पेरणी करणे फायदेशीर व उत्पन्न वाढ देणारे असल्याने त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले.जोराचा पाऊस आला तरी बी,खते वाहून जात नाही.काळी माती वाहून जात नाही.जमिनीतील ओल बराच काळ टिकून राहण्यास मदत होते.पिकांमध्ये खेळती हवा राहते.
या पद्धतीने पेरणी केली तर २५ टक्क्यांपर्यंत उत्पन्नात वाढ होते,असा अनुभव असल्याने व बियाणे कमी लागते,किडींचा प्रादुर्भाव होत नाही म्हणून रुंद वरंबा व सरी पद्धतीनेच पेरणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.हे इझ्रायली तंत्रज्ञान असून त्याने तिथे क्रांती केली,असेही फुकेंनी सांगितले.
शेतकरी उत्पादक कंपन्या एक वरदान -डॉ संतोष चव्हाण..
कायद्यानुसार स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खते निविष्ठा तयार करणे,पिकांसाठी औषधी बनविणे शिकविले असून कंपन्याही हे तयार करुन विक्री करतात.म्हणून या कंपन्या वरदान ठरल्याचे जयकिसान शेतीगटाचे डॉ संतोष चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.येत्या काळात १८०० प्रयोगशाळांची निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.नैसर्गिक शेती करण्याच्या संकल्पनेला चालना देण्याचा सातत्याने प्रयत्न होत असून जैविक सेंद्रिय खते,औषधे यांच्या वापरामुळे फळबागांमध्ये चांगला परिणाम दिसून आला असून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होणे गरजेचे असल्याचे चव्हाण म्हणाले.या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
विलास गायकवाड यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व मूल्य वर्धनाच्या संधी या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले.शेतमालाचे विक्री व्यवस्थापन करणे, यातून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळवून देणे,खरेदी विक्री करुन मध्यस्थांचे उच्चाटन करणे , पेरु,चिकूं,सीताफळ , हळद,डाळ प्रक्रिया उद्योग सुरु करुन ब्रँडिंग,मार्केटिंग करण्याचे काम ह्या कंपन्या करीत असल्याने शेतीमालाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्य होते,असे गायकवाड म्हणाले.या सर्व व्याख्यानांना शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
मत्स्य व्यवसाय जोडधंदा म्हणून किफायतशीर असल्याचे सांगून आपल्या व्याख्यानात बीबी येथील भास्कर सोळंके यांनी मत्स्यव्यवसाय कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती दिली.नंतर लोककलावंत,शालेय विद्यार्थी,गायकवृंद यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कवी नागेश कांगणे,शिवप्रसाद थुट्टे,पूजा मगर यांनी उत्कृष्ट काव्यवाचन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
महाकृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीला जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी सुनील पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर , महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेच्या संचालिका राजश्री जाधव,राज्य वारकरी संघाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय रायमूलकर यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.या कृषी प्रदर्शनीचा आज २९ जानेवारी रोजी समारोप होणार आहे .