खामगाव, खोजमास्टर प्रतिनिधी शाहीदशाह शेत मोजणीसंदर्भात हरकत घेऊनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने २९ जानेवारीला दुपारी भूमिअभिलेख कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
तालुक्यातील आवार येथील शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांनी पिंपरी गवळी येथील गट नंबर २९० मधील सरकारी जमीन मोजणीसंदर्भात हरकत घेतली होती. या चुकीच्या मोजणीत दहा फूट रुंद आणि ८० फूट लांब शेती गेल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याची शहानिशा करून न्याय देण्यात
यावा, अशी मागणी लांडे यांनी केली होती. मात्र, त्यांच्या हरकत अर्जाची भूमिअभिलेख कार्यालयाने कुठलीही दखल घेतली नाही, असा आरोप लांडे यांनी केला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्याने सोमवारी दुपारी खामगाव भूमिअभिलेख कार्यालयात येऊन साहेबांसमोर अंगावर डिझेलओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे या कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकरी लांडे यांना रोखले व ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले.