खोजमास्टर प्रतिनिधी – गावोगावी सरपंचांची थेट निवड झालेली आहे.त्याचप्रमाणे शासकीय निधी थेट ग्रामपंचायत ना मिळत असल्याने ग्रामविकासाच्या कामांचा दर्जा चांगला ठेऊन सरपंचांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडावी:- असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
येथे सुरू असलेल्या श्री अन्न निरंतर कृषी महामेळाव्यात आज आयोजित सरपंच मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.आमदार संजय रायमूलकर अध्यक्षस्थानी होते .
सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण दळवी , कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर चे सभापती माधवराव जाधव ,लोणारचे सभापती बळीराम मापारी , प्रकाशभाऊ मापारी , शिव तेजनकर , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशतात्या वाळूकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगोले , गटविकास अधिकारी बी आर पांढरे , सहायक आयुक्त अमित दुबे , डॉ लोणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विविध गावांमध्ये सरपंचांनी चांगली कामे केलेली आहेत त्यांचे अभिनंदन आहेच, इतरांनी सुध्दा विकासकामे उत्कृष्ट होतील याकडे लक्ष द्यावे ,असे आवाहन खासदार जाधव यांनी केले .आमदार रायमूलकर यांनी आपल्या भाषणात सरपंचांवर ग्राम विकासाची मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी गांभीर्याने विकास कामांकडे लक्ष पुरविण्याचे आवाहन केले .कल्याणी पागोरे यांनी आभार मानले .
तांत्रिक मार्गदर्शन व चर्चासत्रात करडा ता.रिसोड येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ निवृत्ती पाटील यांनी संत्रा लागवड व पीक व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .माती परीक्षण करून घेऊन जमिनीचे पोत निरिक्षण करून घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने खते ,औषधांचे नियोजन करावे व बहर घेतांना योग्य काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले .
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजेश डवरे यांनीही यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.रेशीम व्यवसाय संबंधी डॉ सुधीर फडके यांनी माहिती दिली .ड्रोन द्वारे खते फवारणी बाबत सलाम किसान संस्था मुंबई च्या तज्ज्ञांनी माहिती दिली .
आज कृषी प्रदर्शनीला ७० हजार लोकांनी भेट देऊन पाहणी केली .रविवार सुटीचा दिवस असल्याने मोठी गर्दी झाली होती .पशु प्रदर्शनी मधील उत्कृष्ट पशूंच्या मालकांना खासदार जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले .जिल्हा रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.युवकांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले .तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे चांगले मनोरंजन केले .आत्मा चे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे , कृषिचे जिल्हा अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते .