बुलडाणा, दि. 31 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बुलडाणा उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काही दिवसात निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर विविध समित्या आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांना देण्यात आलेल्या कामांची पूर्वतयारी करून ठेवावी. प्रामुख्याने शासकीय संकेतस्थळ, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जाहिराती हटविण्यात याव्यात. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर खर्च विषयक निरीक्षक जिल्ह्यात येतात. त्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती पुरविण्यात यावी.
निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी. याकामी आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. बाहेरून येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी. मतदान आणि मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा ठेवण्यात यावी. तसेच संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी. निवडणूक कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, मतदान यंत्रणाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प आदी व्यवस्था प्राधान्याने पूर्ण कराव्यात.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. याठिकाणी उमेदवारांची प्रतिनिधी, कर्मचारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, तसेच याठिकाणी मतदानानंतर ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणार आहे, तेथे पुरेशा विजेची व्यवस्था, सुरक्षा ठेवण्यात यावी.
निवडणुकीची सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी यंत्रणंना कामे नेमून देण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.