*आजपासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन*
*नागपुरात पहिल्यांदाच आयोजन*
*250 स्टॉल्ससह खाद्यपदार्थंची राहणार रेलचेल*
*नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन*
नागपूर दि.16 : मुंबई येथील महालक्ष्मी सरसला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे यंदा अतिरिक्त महालक्ष्मी सरस नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 26 फेब्रुवारीपर्यंत रेशीमबाग मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. या उद्देशाने राज्य पातळीवरील मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे ग्राम विकास विभागांतर्गत आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनापासून अनेक महिला बचत गटांनी प्रेरणा घेतली आहे. नागपूरच्या महालक्ष्मी सरसमध्ये राज्य पातळीवरील निवडक सुमारे 250 स्टॉल असतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला संधी दिली असून यात नागपूर जिल्ह्याचे 11 स्टॅाल्स असणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील भिवापुरी मिरचीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून याचाही स्टॅाल राहणार आहे. याचबरोबर गडचिरोलीच्या वन, बांबू उत्पादनांसह कोल्हापुरी चप्पल, पैठणी, कोकणची खेळणी आदी वस्तू ग्राहकांना उपलब्ध होतील. दिवसाला 25 हजार नागरिक प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज घेऊन नियोजन केले जात आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समुहांतील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादने, विक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती व कलाकुसर इत्यादीचा परस्परांना परिचय करून देणे, शहरी भागातील लोकांना अस्सल ग्रामीण भागातील वस्तू, पदार्थ उपलब्ध होणार आहेत.
राज्यभरातील विविध भागांतील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानीच मिळणार आहे. राज्यस्तरावरील या प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत अभियानाला प्रचार व प्रसिद्धी तसेच महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल.
*सकाळी दहा ते रात्री दहा सुरू राहणार प्रदर्शन*
महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे. सरसच्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयंसहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला चालना मिळण्यासाठी यातून मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.*
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा*
महालक्ष्मी सरसचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज आढावा घेतला. प्रशासनातर्फे प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. प्रदर्शनाविषयी आवश्यक सूचना करीत श्रीमती शर्मा यांनी तयारीचा आढावा घेतला.