पेठ जवळील पैनगंगा नदीवरील पूल आणि धोकादायक वळण असलेल्या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली असून आज याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
चिखली ते खामगाव दरम्यान चिखली शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठ गावाजवळील पैनगंगा नदीच्या पुलावरून जाणारा वळण रस्ता अतिशय धोकादायक असल्यामुळे येथे बरेच अपघात घडत असत; शिवाय पैनगंगा नदीवरील पूलही मोडकळीस आल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. याविषयी उपापयोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे सदर मागणीची तात्काळ दखल घेत दीड वर्षांपूर्वी या पुलाचे व रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांना केली होती. क्षणाचाही विलंब न करता मा. मंत्री महोदयांनी ३५ कोटी ८० लक्ष रुपयांच्या या दोन्ही कामांना मंजुरी दिली.
राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, खामगाव अंतर्गत आता ही कामे सुरू झाली असून पुलाच्या पायाभरणीचे काम पूर्ण होऊन पुढील टप्प्यातील बांधकाम सुरू आहे, तर रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या दोन्ही बांधकामांना आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच अस्तित्वातील पुलाला बंधारा बांधून स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी पेठ गावाकडील बाजूला पाणी साठवण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याच्या देखील सूचना यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.