नाशिक : राज्य सरकारच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविण्याची सूचना महापालिका शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना दिली आहे. या सूचनेमुळे आता पुढील वर्षाचे नियोजन करताना शाळांना दोन सत्रांत शाळा भरवून, आधीच्या वेळांची अदलाबदल करावी लागणार आहे. तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांची झोप पुरेशी होत नसल्यामुळे त्यांना एकाग्रता, अभ्यास, क्षमता आणि उत्साह यात अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी पहिली ते चौथीच्या वर्गांची शाळा नऊ किंवा त्यानंतर भरविण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पूर्वप्राथमिक शाळा नऊपूर्वी न भरवता नऊ किंवा त्यानंतर भरविण्याचा निर्णय राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केला. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी शहरातील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनाच्या शाळांसाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पत्र जाहीर केले आहे.आता शहरातील शाळांना पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या पूर्वप्राथमिक वर्गांच्या शाळा सकाळी आठपासून भरतात. परंतु, या शाळांची वेळ एक तास किंवा त्यापेक्षा अधिक पुढे जाणार आहे. म्हणजे नऊ ते दोन किंवा दहा ते तीन अशा वेळेत हे वर्ग भरवावे लागणार आहेत. मर्यादित वर्ग खोल्यांमुळे या नवीन नियमानुसार दुपारच्या सत्रात भरणारे पाचवी ते सातवी किंवा आठवीचे वर्ग सकाळच्या सत्रात भरवावे लागणार आहेत.