नरेंद्र मोदींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकून आहे : राधाकृष्ण विखे

Khozmaster
3 Min Read

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (७ मे) नगरमध्ये प्रचारसभा होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या सभांमधून मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रामुख्याने टीका केली आहे. त्यामुळे नगरच्या सभेत मोदी नवीन काय बोलणार याकडे लक्ष लागले असतानाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच पवारांवर निशाणा साधला आहे. ‘पवारांनी बारामतीच्‍या बाहेर जावून काय केले?’ असा सवाल करून ‘तुम्ही दाऊदच्‍या हस्‍तकांना विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अजून विसरलेली नाही,’ हा पवार यांच्यावर होणारा जुना आरोप विखे पाटील यांनी पुन्हा केला आहे.

मोदींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकून

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी मोदींची नगरमध्ये सभा होत आहे. त्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा मंत्री विखे यांनी आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍यावर बोलावे हेच मुळात दुर्दैव आहे. मोदींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकून आहे. विखे पाटलांनी काय केले हे शरद पवारांना सांगण्‍याची गरज नाही. या जिल्‍ह्यातून आठ वेळा बाळासाहेब विखे पाटील यांना संसदेत प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळाली. मलाही सात वेळा जनतेने निवडणून दिले, ही आमच्‍या कामाची पावती आहे. शरद पवार यांचे जिल्‍ह्यासाठी काय योगदान आहे हे त्‍यांनी एकदा सांगावे.

दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेवून आलात, जनता विसरली नाही

पवार महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री होते, केंद्रातही त्‍यांना मंत्रिपद मिळाले, बारामतीच्‍या बाहेर जावून त्‍यांनी काय केले? नगर जिल्‍ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहेरबानी नाही. आम्‍ही काय केले यापेक्षा दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अद्याप विसरलेली नाही. बारामतीच्‍या बाहेर ते काहीही करु शकलेले नाहीत. केवळ संस्‍था बळकावण्‍याचे काम त्‍यांनी केले. रयत शिक्षण संस्‍था ताब्‍यात घेवून त्‍याचा राजकीय अड्डा त्यांनी केला, असा आरोपही विखे पाटील यांनी पवार यांच्यावर केला.

थोरात वैफल्‍यग्रस्‍त झाले आहेत, नगरसाठी त्यांचे योगदान काय?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्‍यावरही मंत्री विखे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, थोरात वैफल्‍यग्रस्‍त झाले आहेत. त्‍यांच्‍या बोलण्‍याला आता कुठलाही आधार राहिलेला नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्‍या कामांची चित्रफीत मी थोरात यांना पाठविणार आहे. थोरातही अनेक वर्षे राज्‍याच्‍या मंत्रिमंडळात होते. नगरसाठी त्‍यांचे योगदान काय? मंत्री पदाच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही जिल्‍ह्याला कसा फायदा करुन दिला, हे एकदा तरी सांगा. मी महसूल मंत्रिपदाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यासाठी कोणते निर्णय घेतले, हे सांगायला तयार आहे. पूर्वीप्रमाणे बदल्‍यांचे रेटकार्ड आमच्‍याकडे नाही. भारतीय जनता पक्षामध्‍ये येण्‍याची तुमची तयारी झाली होती. तुमच्‍यासाठी कोणता आमदार मध्‍यस्‍थी करीत होता हेही मला माहिती आहे. भ्रष्‍ट कारभारामुळे दिल्‍लीतून कसा नकार मिळाला. याचे शल्‍य आता थोरात यांना असल्याने त्यांचा तोल सुटला आहे, असेही विखे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *