बुलढाणा: लोकसभा मतदारसंघाकरता २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यामध्ये तिरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीच्या वतीने शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार म्हणून या तिरंगी लढतीत लढत आहे.
कोण निवडून येणार कुणाला किती मताधिक्य मिळणार या पारावरच्या चर्चा रंगत असताना काँग्रेसच्या एका माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने चक्क आपल्या मित्रासोबत पैज लावून ती जाहीर करून टाकली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. बुलढाण्यातील निवडणूक चर्चेत आहे. क्षणाक्षणाला बदलणारे राजकारण, उमेदवारांकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे, तसेच निकालाकडे जितकं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ३.१५ लाख रुपयांची पैज लावली आहे. पैज जिंकणाऱ्यास ९.४५ लाख रुपये मिळतील.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच अफलातून आंदोलन, थेट हाणामारीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाट्टेल ते करण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्या ‘महिलांचे अपहरण’ या वक्तव्यावरून कदम यांची जीभ तोडणाऱ्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी ती धमकी होती.
मात्र, आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. ते म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा आणि आत्मविश्वास असल्याने त्यांनी मुंबईच्या एका मित्रासोबत लाखोंची पैज लावली आहे. विशेष म्हणजे ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर जाहीर सुद्धा करून टाकली. त्यामुळे सावजी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पैजेनुसार सावजी यांचे म्हणणे खरे ठरले तर त्यांना ९ लाख ४५ हजार रुपये रोख मिळणार आहेत आणि प्रतापराव जाधव हे निवडून आले तर सावजींना ३ लाख १५ हजार रुपये रोख आपल्या मित्राला लावलेल्या पैजनुसार द्यावे लागणार आहेत. मतदारसंघात सावजी यांनी नवीन विषय चर्चेसाठी दिला आहे.