चंद्रपूरची निवडणूक आरसा दाखवणारी; मतदारांना राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्दे महत्त्वाचे…

Khozmaster
2 Min Read

चंद्रपूर: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली. या लाटेवर स्वार होऊन अनेकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी जे विजयी झालेत ते आत्ता सुद्धा मोदी लाट असल्याच्या भ्रमात आहेत. हा भ्रम पाण्यावर उठणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे आहे, याचा साक्षात्कार नवनीत राणा यांना झाला आहे. “मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका. २०१९ मध्ये मी अपक्ष असताना जसे काम केले, तसेच करा”, असे वक्तव्य राणा यांनी केले होते. मीडिया आणि समाजमाध्यमांनी राणांचे हे वक्तव्य चांगलेच उचलून धरले. त्यानंतर माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ मीडियाने लावला, असे बोलून राणा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र यातून हे लक्षात आले की, राणांच्या पोटातलं शेवटी ओठावर आलंचं. राज्यातील एकंदरीत वातावरण बघता मोदी लाट ओसरली असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. या लाटेचा थेट परिणाम चंद्रपूर लोकसभेत सुद्धा बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, छगन भुजबळ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते मंडळींनी चंद्रपूरात हजेरी लावली होती तसेच सिने कलावंताचा रोड शो सुद्धा झाला.

सध्याची चर्चा बघता याचा फार फायदा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना झालेला दिसत नाही. मोठे नेते, स्टार प्रचारकांची उपस्थिती नसतानाही महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचे नाव चर्चेत आहे. स्वतःचे कार्य व कर्तृत्व मतदारांपुढे न ठेवता, केवळ आपल्या नेत्याचा जप करणाऱ्या उमेदवारांना चंद्रपूरची निवडणूक आरसा दाखवणारी ठरली आहे.

स्थानिक मुद्दे गायब…

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे गायब झाल्याचे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे. सभेला संबोधित करताना राष्ट्रीय मुद्द्यांवरच उमेदवार बोलताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि मागासलेपणाची चादर ओढून बसलेला गडचिरोली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांनी राष्ट्रीय मुद्द्यांवरच अधिक भाष्य केले. त्यात सरकारने दहा वर्षात काय केलं, याच्या पाढाच अधिक वाचला गेला.

चंद्रपूर, गडचिरोली मतदार संघातील ग्रामीण भागात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील या मतदारांना राष्ट्रीय प्रश्नांशी तसंही काही देणं घेणं नव्हतं. त्यांना गावाचा आणि स्वतःचा विकास हवा होता. यावर नेते बोलतील अशी अपेक्षा त्यांना होती मात्र तसे काही घडले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपावर मतदार नाराज होते. भाजप सत्तेत असल्याने या नाराजीचा सर्वाधिक फटका भाजप उमेदवारांना बसला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *