सिल्लोड : चोरीच्या घटना, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. आठ दिवसांत ६३ उत्तम दर्जाचे कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे बसल्याच्या आठ दिवसांत एकही चोरीची घटना घडलेली नाही.मागील दोन महिन्यांत दोन दुचाकी चोरी, दोन बैलांची चोरी, दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शिवना गावामध्ये मुख्य रस्त्यावर; तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावर १५ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पाणवडोद, लिहाखेडी, मांडणा, धोत्रा रस्त्यावर व मुख्य रस्त्यावर एकूण ४८ सीसीटीव्ही नव्याने ग्रामस्थांच्या सहकार्यातून बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हींमुळे गुन्हे, चोऱ्या तसेच यांना आळा बसेल, असा विश्वास अजिंठा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वांत जास्त चोऱ्या होणाऱ्या शिवना, मांडणा, लिहाखेडी, धोत्रा या गावांतील मुख्य चौकात उत्तम दर्जाचे कॅमेरे बसविले आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर आठ दिवसांत या गावात एकही चोरीची घटना घडलेली नाहीत.पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून उपक्रम होत आहे. ज्या गावात चोऱ्या होतात, असे संवेदनशील गावात आम्ही पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून आठ दिवसांत बाजारातील मुख्य रस्ता, बाजारपेठ आदी संवेदनशील भागांत वरील कॅमेरे बसविलेले आहेत. हे कॅमेरे बसवल्यानंतर एकही चोरीची घटना घडलेली नाही.