मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात स्थानिक रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. ऑक्टोबर महिन्यात उच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय आज जाहीर करण्यात आला.
आक्षेप घेणाऱ्या स्थानिकांच्या याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही शहरांचे नामांतर कायम राहणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा निर्णय योग्यच आहे, त्यामुळे कोणालाही काही फरक पडण्याचं कारण नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं.या प्रकरणात याचिकाकर्त्यांना कोणताही आर्थिक दंड ठोठावण्यात आलेला नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मानला जातो. कारण अहमदनगरसारख्या आणखी शहरांच्या नामांतराचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं सूतोवाच सरकारने नुकतंच केलं होतं.