सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून चुरशीचं मतदान सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील उर्दू शाळा महानगरपालिका बेगम पेठ येथील मतदान केंद्रावर गेले. भाजपचे उमेदवार राम सातपुते आल्याने काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जमा झाले. भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमनेसामने आल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना माहिती देत होते, बोगस मतदान होऊ देऊ नका, चेहरे पाहा, असा सल्ला दिला. यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील मतदान अधिकाऱ्यांना सल्ला देत, आरडाओरडा केली. त्यामुळे राम सातपुते यांनी देखील संताप व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली.
बेगम पेठ परिसरात ताबडतोब पोलिसांची टीम दाखल
बेगम पेठ येथील उर्दू शाळेसमोर राम सातपुते आल्याची माहिती होताच काँग्रेसचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मतदान केंद्रासमोर गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांची मोठी टीम दाखल झाली. एका व्यक्तीला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेत पोलीस स्टेशनला रवाना केले. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आला आणि सर्व गर्दीला पांगवलं. परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत झाली आहे.
संथ गतीने मतदान सुरू असताना गोंधळ सदृश परिस्थिती
सोलापूर लोकसभा मतदार संघात संथ गतीने मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मतदान सुरू असताना भाजपचे राम सातपुते हे सोलापूर शहरातील बेगम पेठ परिसरात असलेल्या एका मतदान केंद्रावर आले आणि विरोधक असलेल्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली.