अहमदनगर : निवडणुकीत पैसे वाटपाच्या चर्चा होत असतात. त्याला उद्देशून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वी एकदा लक्ष्मीदर्शन असा शब्द वापरला होता. तोच शब्द आता नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी वापरला आहे. राहुरीतील प्रचार सभेत बोलताना लंके म्हणाले, मतदारसंघात लक्ष्मीदर्शन सुरू झाले आहे. लक्ष्मीकडे पाठ करू नका. गरीबाघरचं लग्न नाही. तिकडून घ्या, राहिलं थोडं फार तर माझ्याकडेही पाठवा. मत मात्र मलाच द्या, असे लंके म्हणाले आहेत.यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, हर्ष तनपुरे, नितेश कराळे, शहराध्यक्ष संतोष आघाव, सुर्यकांत भुजाडी, शिवसेनेचे सचिन म्हसे, बाळासाहेब आढाव उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करताना लंके म्हणाले, ज्यांना पाच वर्षापूर्वी आपण संसदेत पाठविले त्यांनी काय दिवे लावले ? शेतकऱ्याचा, समाजहिताचा एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही. मतदारसंघातील विकास कामेही केली नाहीत. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलले पाहिजे.
नगर-मनमाड रस्ता त्यांना करता आला का ? माझे नाते शेतकऱ्यांशी, गोरगरीबांशी आहे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी २४ तास काम करण्याचा माझा शब्द आहे. कांदा उत्पादक मतदारसंघात मतदान आहे म्हणून आता निर्यातबंदी उठविल्याचे सांगितले जात आहे. मुळात कांदा निर्यातीवर बंद आणलीच कशाला? ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कांदा विकला त्याचा काय हिशेब आहे? आता ग्रामीण भागाप्रती संवदेना नसणाऱ्या सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल लंके यांनी केला.